-झुंजार पेडणेकर ( मसुरे )
श्रध्देने देवी भराडी समोर नतमस्तक होताना आपल्या मनातील ईच्छेचे एकएक पान उलगडत जाते. भक्त देवी समोर आपली झालेली चुक कबूल करतात. भविष्यात उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य मिळावं यासाठी नतमस्तक होतात. भराडी माता सर्वव्यापी असल्याने तिला कोठूनही हाक मारली तरी ती ऐकते अशी श्रध्दा असणारे असंख्य भाविक तीची भेट घ्यावी म्हणुन प्रयत्न करत असतात. या यात्रेत ओटी भरण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा तितका महाप्रसादाचाही क्षण महत्वाचा. रात्रीचा प्रसाद ( ताटे लावणे ) भिक्षा मागून मिळवण्याच्या प्रसंगाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता एखादी अप्रीय घटना घडू नये याची आंगणेकुटुंबियानी काळजी घेत देवीच्या आदेशाने सदर प्रसाद वाटपाची प्रथा बंद केली. मागील तीन वर्षे सर्वच भाविकांना सुका मेवा, गोड बुंदीच्या स्वरुपात हा प्रसाद अगदी सकाळपासून देवालयाच्या मागील प्रसाद वाटप कक्षात मिळतो !
यात्रे दिवशी सकाळी देवी भराडी मातेचे दर्शन घ्यायचे व घरी परतायचे हाच या आसपासच्या गावातील लोकांचा दरवर्षीचा शिरस्ता. कारण पुन्हा रात्री प्रसादाचा ‘ ताटे लावण्याचा ’ सोहळा अनुभवण्यसाठी आंगणेवाडीत दाखल व्हायचं असतं ! जत्रेदिवशी आंगणेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या घरातल प्रत्येक कुटुंबातील लहान थोर व्यक्तींचा उपवास असतो. लहान मुलानाही जेवण दिले जात नाही. त्याना फलाहार वैगरे दिला जातो. येथील प्रत्येक घराघरत महाप्रसाद बनविला जातो. ज्या गृहीणी हा महाप्रसाद बनवतात त्या दिवसभर मौनव्रत धारण करतात. आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील सुहासीनी कुणाशीही न बोलता हा बनवलेला प्रसाद मंदिरामध्ये नैवेद्य म्हणून घेऊन बाहेर पडताना रात्रीचे दहा वाजलेले असतात. यालाच ‘ ताटे लावण्याचा ‘ सोहळा असे म्हटले जाते. या सुहासनींच्या डोक्यावरील प्रसादाच्या ताटाला धक्का लागू नये म्हणून कुटुंबातील महत्वाची व्यक्ती या महिलांच्या पुढे राहून पेटत्या मशालीच्या उजेडात मंदिर पर्यंत साथ करतात. देवालय परिसरात लाकडी उड्डाण पुलाची व्यवस्था झाल्या सर्व महिला याच पुलावरून मंदिरा मध्ये प्रवेश करतात. महाप्रसादाचा हा अलौकीक सोहळा पाहण्यासाठी, महाप्रसादातील एक शीत झेलण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी देवलयाच्या बाहेरील परिसरात व्हायची. देवालयामध्ये प्रसाद दाखविण्याचा कार्यक्रम झाल्या नंतर माघारी परतत असताना ताटातील हा प्रसाद उपस्थत भाविकांवर उधळला जायचा. काही भाविक तर दिवसभराचा उपवास करून भाताचे एक शित प्रसाद म्हणून मिळाल्यास कृतकत्य होत असत. या परिसरात हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे व यावर नियंत्रण मिळवताना पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडायची. काही दुदैवी घटना घडू नये यासाठी आंगणेवाडी कुटुंबियांच्या वतीने मागील दोन वर्षापूर्वी महाप्रसाद उधळण्याची ही प्रथा देवीच्या हुकमाने बंद करण्यात आली आहे. भाविकाना मंदिर मागील प्रसाद कक्षात चुरमुरे, सुकामेवा तसेच गोड बुंदीच्या स्वरुपात हा प्रसाद मिळतो.
ताटे लावण्याचा कार्यक्रम संपल्या नंतर प्रत्येक आंगणे कुटुंबियांच्या घरी हा प्रसाद दिला जातो. असंख्य भाविक या प्रसादाचा लाभ घेतात. प्रसाद घेण्यासाठी असलेल्या उपस्थितां मध्ये कित्येक चेहरे त्या घरातील कुटुंबयाना अनोळखी असतात. परंतु अशा अनोळखी चेह-याना जेवणाची प्रथम संधी आंगणे कुटुंबियांकडून दिली जाते. हेही आंगणेवाडीचे एक वैशिष्ठच मानावे लागेल. कोणी ओळखीचा असुदे अगर नसुदे प्रसाद मिळणारच आणि तो सुध्दा सर्वांच्या आधी याची खात्रीच असल्याने अनेक भाविक काही ठरावीक घरात अगदी त्यांच्या घरातील सदस्यां प्रमाणेच प्रती वर्षी हा महाप्रसाद घेतात. आंगणे कुटुंबियांच्या घरच्या अंगणात जेवणाच्या पंक्तीच उठत असतात. पण कुठेही नाराजीच सुर आंगणे बांधवांच्या चेह-यावर नसतो. प्रसादाचा हा सोहळा पाहण्यासारखाच तितकाच अनुभवण्या सारखाच असा असतो.
आंगणेवाडीतील प्रत्येक घरामध्ये बनवलेला महाप्रसाद अशा प्रकारे डोक्यावरून महिला मंदिरात आणतात |
आंगणे कुटुंबियांच्या घरी महाप्रसाद घेण्यासाठी रात्री अशा प्रकारे जेवणावळी उठत असतात. |